skip to main |
skip to sidebar
विविध कारणामुळे मागील २ आठवडे रद्द होत असलेली आमची मोहिम हडसरच्या रुपाने २७ फेब्रुवारीला मार्गी लागली. खरतर आम्हाला आजोबा आणि कळसुबाई ची मोहिम पुर्ण करायची होती पण २८ ला होळी असल्यामुळे फक्त हडसर करायचे ठरले. नेहमी प्रमाणे सकाळी ५:३० वाजता भेटायचे ठरले आणि सालाबादा प्रमाणे, परंपरा राखत ड्युड ६:०० वाजता आवडती मरिना (मारिया ??) सोबत हजर झाला.
सकाळी नारायणगावाजवळ चहा घेतला आणि नाष्टा करण्यासाठी ड्युडने जुन्नरच्या हॉटेल पुनमचीच निवड केली त्याला हे नाव फारच आवडते बुवा. काय भानगड आहे काही कळत नाही. असो, हॉटेल बाहेर एका बाबांना हडसर बद्द्ल विचारले, त्यानी सरळ आपताळे मार्गी जा असे सुचविले . त्या प्रमाणे आम्ही आपताळेला निघालो, चावंड ला याच मार्गी गेल्यामुळे रस्ता तसा थोडाफार परिचयाचा होता. आपताळेला पोहचल्यावर एके ठिकाणी चौकशी केली आणि वेगळीच माहिती समोर आली. हडसर ला जायला आपताळे पासुन वाट तर होती , पण ती वाट, वाट लावणारी आणि हाड(सर) खिळ खिळी करणारी आहे असे तिथल्या एका जीप चालकाने सांगीतले. मग काय… परत जुन्नरला यावे लागले. १ तास वाया गेला पण त्या वेळेच्या उपयोग अभि आणि अमरने कॉलेज मध्ये कोण जास्त मठ्ठ होते या चर्चासत्रासाठी केला. दोघेही तुल्यबळ असल्यामुळे मलातरी सामना बरोबरीत सुटला असे वाटले, पण ड्युडने मात्र तोच खरा या प्रमाणे स्वता: ला विजयी घोषित केले.
जुन्नरला छ्त्रपतींच्या पुतळ्या पासुन उजव्याबाजुचा रस्ता पकडला आणि माणिकडोह धरणाच्या कडेचा रस्त्याने आम्ही हडसर गावी पोहचलो. गाडी एका वावरात पार्क केली आणि किल्ल्याकडे निघालो.एव्हाणा चांगले १० वाजले होते आणि ऊन जाणवायला लागले होते. मुख्य रस्ता सोडुन एका घरामागुन किल्ल्यासाठी राजमार्गाकडे वाट जाते. गावातुन किल्ल्याची तटबंदी दिसते. किल्ल्याच्या चारही बाजुला नैसर्गिक सरळ उभी काताळ भिंत आहे. किल्ला २ डोंगरावर बसलेला आहे. या दोन डोंगरामध्ये किल्ल्याचे मुख्य दार आहे. हडसर पासुन जाताना या लहान डोंगराच्या बाजुने राजमार्गाकडे जाता येते. पायऱ्याचा मार्गाच्या आधी एक चौकोनी भुयार लागते, ती बहुधा चोर वाट असावी. पायऱ्या चढुन वर गेल्यावर काताळात कोरलेले दोन अप्रतिम द्वार आहेत. पुढे उजव्या बाजुला पाण्याचे टाक आहे. तिथेच पाषाणात कोरलेली अप्रतिम गणेश मुर्ति आहे. या इथुन काताळात कोरलेल्या पायऱ्यांचे अप्रतिम दृश्य दिसते तसेच भोवताली माणिकडोह धरणाच्या जवळ असलेले शिवनेरी, चावंड, ढाकोबा, जिवधन, निमगीरी, नाणेघाटाचा प्रदेश दिसतो.
राजद्वाराच्या डावी कडे पाण्याचे तळे आहे आणि पुढे शंकराचे मंदिर आहे. आणखी पुढेगेल्यावर आणखी एक बुरुज नजरेस येतो. या इथुन समोर पिंपळ्गाव जोगा धरण आणि जवळील हटकेश्वर, शिंदोळ्या आणि हरिश्चंद्रगड नजरेस पडतो. गडाला चक्कर मारुन आम्ही ३ वाजे पर्यंत आम्ही खाली उतरलो. येताना ड्युड ला शिवनेरी किल्ल्याच्या काताळात कोरलेल्या लेण्या पहायची हौस झाली. मला माझी क्षमता चांगलीच माहित असल्यामुळे मी त्याला नको म्हणालो. त्याच्या हौसेच्या ठिणगीला अमर ने नेहमी प्रमाणे रॉकेल ओतत आगीचे रुप दिले, मगकाय काहीही झाले तरी जाउच असे म्हणुन ड्युड्चा अहम जागा झाला आणि आम्ही जुन्नरपासुन थोडे पुढे गाडी पार्क केली आणि निघालो. थोडे पुढे गेल्यावर वाट बिकट होउ लागली आणि मी, गौरव आणि अजय ने पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आणि ड्युड आणि अमर पुढे निघाले. आम्ही खाली आलो उतरलो आणि तब्बल १ तासानंतर ड्युड आणि अमर खाली आले. लेण्यांबद्दल सांगताना अभिने(ड्युड) वर चढ्ण्याच्या वाटेजे काही वर्णन केले ते ऐकुन मी थक्क झालो. तो म्हणाला "एका ठिकाणी काय करावे हेच कळत नव्हते . धड पुढे जाता येत नव्हते आणि मागे येता येत नव्हते. पाय लट लट कापत होते. शेवटी कसा तरी वर आलो". ड्युड ला मी चांगलच ओळखतो. ज्या ठिकाणी माझी बोबडी वळलेली असते अशी ठिकाण सुध्दा हा पट्ठा एका हातात camera पकडुन लिलया उतरतो. आणि त्याचे हे वर्णन माझा वर न जाण्याचा निर्णय किती योग्य होता हे मला तंतोतंत पटले.
असो शेवटी ५ वाजता परत पुनम मध्ये चहापाणी घेऊन आम्ही पुण्याचा रास्ता पकडला.
Details
Region: Junnar
Route: Pune – Narayangao– Junnar – Hadsar
Difficulty level: Easy
~ Distance from Pune : 120 Km
Potable water/food : Not available on fort
Place to stay overnight: Small temple to accommodate 4-5 people.
snaps : http://picasaweb.google.co.in/khenatram/Hadsar