मृगगड चे नाव मोहन ने सुचविले होते, ९-१० जानेवारीला सवाई गंधर्व असल्यामुळे १६ तारीख ठरली. नेहमीप्रमाणे mails झाल्या नंतर फ़क्त ५ जण तयार झाले ( अभिजीत, मोहन , अमर, विनोद आणि मी) आणि ५ जणांसाठी अभि च्या मरिना पेक्षा चागली गाडी कोणती असणार?
सकाळी ६:०० वाजता आम्ही निघालो , ६:१५ ला विनोदला आकुर्डीतुन उचलले आणि जुन्या हायवेने आम्ही खोपोली ला पोहोचलो, पुढे एका हॉटेल मध्ये नाष्टा केला, बिल देताना महागाई ची झळ बसली (एक प्लेट पोहे २० रुपये). तिथुन आम्ही जांभुळपाड्याची वाट धरली. या वेळेचे औचित्य साधुन तब्ब्ल दिड वर्षानी आमच्या सोबत ट्रेकला आल्या बद्दल टॉवेल , हार आणि श्रीफळ देउन विनोदचा सत्कार करण्यात आला.
वाटेत एका ठिकाणी रोडवर ऑइल सांडले होते आणि त्यावरुन एक दुचाकी घसरलेली दिसली. आम्ही तिथे थांबलो, मोहनने त्यांचा प्रथमोपचार केला आणि आम्ही रोडवर ऑइल सांडलेल्या जागी माती टाकली. जांभुळपाड्यासाठी मेन रोड सोडुन आम्ही डावी कडे वळलो. जांभुळपाड्या पासुन बेलिवचा रस्ता धरला. गाडी गावाबाहेर पार्क करुन किल्ल्याचा रास्ता पकडला. गावामागे ३ डोंगर आहेत, त्यातील मधला म्हण्जे मृगगड, याला बेलिव चा किल्ला असे सुध्दा म्हण्तात. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोंगरामध्ये एक खिंड आहे.
खिंडीच्या अलीकडे उजव्या बाजुला एक चौकोण गुहा दिसते, अमर, अभि आणि विनोद आत शिरले पण आत मध्ये काळोख असल्या मुळे ते परत आले आणि पुढच्या मोहिमे पासुन टॉर्च घेउन यायचे असा प्रस्ताव मंजुर झाला.
खिंड चढुन वर गेल्यावर एक छोटे पठार आहे, तिथुन भोवतालीचा सुंदर परिसर दिसतो, सुसाट वाऱ्याचा अनुभव घेण्यासाठी हि जागा एक नंबर आहे.
अमरने पुढची वाट दाखवली आणि ती पाहुन माझी विकेट उडाली, किल्ल्यावर जाण्यासाठी २५-३० फुट उंच काताळात पायऱ्या कोरल्या होत्या. मोहन ला "तुला हाच एक गड मिळाला का?" असे म्हणुन बराच वेळ त्या वाटेकडे वाट लागलेल्या माणसाप्रमाणे शुन्यात विचार करुन मी इतरांना "खरच पुढे जायचय का ? " असा प्रश्न केला.
सर्वानी चल रे काही नाही होत अस म्हणुन माझा हुरुप वाढविला. अमर पुढे, त्यामागे मला गाइड करायला विनोद पुढे सारावला, माझ्या मागे मोना आणि सर्वात शेवटी ड्युड. इतर सगळे सहजतेने चढ्त होते, मी मात्र काताळाला पकडत हळु हळु पुढे सरकत होतो, शेवटी कसातरी वर पोहचलो आणि आपण परत सुखरुप परत खाली जाणार का? असा भयानक प्रश्न मला पडला, पण पुढ्च पुढे बघु अस म्हणुन मी पुढे निघालो.
किल्ल्यावर पाहण्यासारखे काही विशेष आढळळत नाही, एकुण पसारा पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहाळणी साठी करत असावेत. थोडावेळ वर आराम केला आणि परतीचा प्रवास सुरु केला. आता परत त्या जागी आल्यावर माझी त्रेधातिरपिट उडाली, सर्वानीं खाली पाहु नकोस , फ़क्त पायऱ्यांकडे ध्यान दे असे सांगितले, मनातल्या मनात मी परत या किल्ल्यावर येनार नाही आणि कोणाला याला भेट द्या असे सांगनार नाही असे ठरवुन मी उतरु लागलो. माझ मार्गदर्शन करण्यासाठी अमर माझ्या पुढे उतरला. इथे पाय ठेव, हात इथे ठेव अशा सुचना मला मिळत होत्या आणि मी जीव मुठीत धरुन त्यांचे पालन करीत खाली उतरलो. मगे मोहन धीर देत होता.
खाली उतरायला १०-१५ मिनिटे लागली. तासाभरात खाली आलो, वाटेत येताना परळी या गावाजवळ घोटवडे बंधारा आहे, तिथे जवळपास अर्धा तास गप्पा मारुन आम्ही पुण्याकडे निघालो.
मनात एकच विचार चालु होता….
मृगगड ला पुन्हा जायचे नाही आणि कोणाला जा असे सांगायचे नाही.
Details
Region: Raigad , Sudhagad taluka
Route: Pune – Khopoli – Jambhulpada – Beliv
Difficulty level: Medium +
~ Distance from Pune : 120 Km
Potable water/food/place to stay overnight: Not available on fort
Snaps : http://picasaweb.google.co.in/khenatram/Mruggad#